उमेळे परिसरातील देवस्थाने

।। श्री साकाई देवी मंदिर ।।

उमेळे गावातील पाटील कुटुंबातील एका मुक्या भक्ताला दृष्टांत देऊन गावात आलेली उमेळेकरांची ग्रामदेवता श्री साकाई देवी. हे मंदिर पूर्वी कौलारू होते. नंतरच्या काळात देवस्थान मंडळाच्या माध्यमातून व गावकऱ्यांच्या देणगीतून आताच्या काळात असलेलं एक सुंदर मंदिर बांधले गेले आहे. चैत्र चतुदर्षीला देवीची मोठी जत्रा भरते.जत्रेच्या निमित्ताने अनेक पिढयातील कलावंतांनी नाटके सादर केली.सुमारे 65 वर्षापूर्वी कै. वासुदेव रामचंद्र राऊत व त्यांच्या सहकार्यांनी सेवा नाटय मंडळाची स्थापना केली व अनेक दर्जेदार नाटके सादर केली, ती परंपरा आजही चालू आहे. श्री साकाई देवीचे वैशिष्ट्य असे की, मंदिराच्या बाजूस असणाऱ्या विहिरीत देवीच्या पायाखालून झरा वाहतो. एप्रिल-मे महिन्यात गावातील इतर विहिरीतील पाणी संपायचे, पण या एका झऱ्याने गावातील अनेक पिढया पोसल्या गेल्या. तसेच ही उमेळे गावातील एकमेव गोडया पाण्याची विहिर. मंदिरासमोरील दिपमाळ ‘श्री. राघोबा विठोबा चैधरी’ यांनी चैत्र शुध्द 1, षके 1833 रोजी बांधली व त्या दिपमाळीच्या देखभालीसाठी स्वतःच्या मालकीची मंदिरा जवळील साडे चौदा गुंठे शेत जमीन सन 1960 साली श्री साकाई देवी दिपमळा ट्रस्ट स्थापून अर्पण केली. देवीच्या मंदिराचा घुमट ‘श्री दामोदर कृश्णा तांडेल’ यांनी बांधला होता. अशा स्वरूपाची लादी मंदिराच्या पायथ्याशी होती.नवरात्र उत्सवात देवस्थान मंडळ व गावातील तरूण-तरूणी अनेक स्पर्धांचे आयोजन करतात.अष्टमीचा होम व त्या निमित्ताने भंडाऱ्याचे आयोजन देखील करतात.

।। श्री हनुमान मंदिर ।।

गावाच्या पश्चिमेला हनुमान आळी. जेव्हा फार फार वर्षापूर्वी तलाव खोदला गेला त्या उत्खन्नामध्ये एक पाषाणाची हनुमान मूर्ती सापडली. गावकऱ्यांनी तलावाच्या काठावर त्याची स्थापना केली. या गोष्टीला किती काळ लोटला हे नक्की सांगता येणार नाही. परंतू त्याकाळी गावकऱ्यांनी त्यांच्या ऐपती प्रमाणे एक कौलारू मंदिर बांधले. लाकडी खांब व वर कौलारू छप्पर.गावातील जेष्ठ व्यक्ती श्री. हरिश्चंद्र केशव चैधरी वय वर्षे – 91, यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 80 वर्षापूर्वीच्या म्हणजेच त्यांच्या लहानपणीच्या काही गोश्टी सांगितल्या त्या अशा- त्याकाळात भिंती नसलेल्या व खाच खळगे असलेल्या मंदिराची देखभाल सावंत कुटुंबातील कै. रामू काकांची आई बहिरीकाकू ही करत असे. नंतर त्या मंदिराला चारही बाजूला भिंती घातल्या गेल्या पण त्याला प्लास्टर नव्हते. आता गावातील काही दानषूर व्यक्ती व देवस्थान मंडळाच्या माध्यमातून एक सुंदर असे आखीव रेखीव मंदिर बांधले गेले आहे. त्या मंदिरात हनुमंता बरोबर गणपती, विट्ठल रखुमाई व शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. या मंदिरातील हनुमानाची पाषाणातील मूर्ती ही वैशिष्टपूर्ण अशी आहे. हनुमंताने शनीला आपल्या पायाखाली दाबले आहे. ज्यांना शनीची साडेसाती असते त्यांनी या हनुमंताची पुजापाठ केल्यास त्यांना तो बाधत नाही. नंतरच्या काळात औदुंबराच्या लाकडापासुन सलग अशा कोरलेल्या हनुमंत व राम, लक्ष्मण, सीता हया मूर्ती सुध्दा या मंदिरात आहेत. हा हनुमंत नवसाला पावतो ही गावकऱ्यांची श्रध्दा. श्रावण महिन्यातील शनिवारी मारूतीरायाला नवसाची केवडयाची वाडी वाजत गाजत नाचत भरली जाते. भजन किर्तन यासारखे कार्यक्रम तसेच हनुमान जयंतीला जागृत नाटय मंडळाच्या माध्यमातून मनोरंजनासाठी दर्जेदार नाटके सादर केली जातात.

।। श्री दत्त मंदिर ।।

गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री दत्त मंदिर. फार पूर्वी गावात राहात असलेल्या पुरोहित कुटुंबियांच्या मालकीचे हे मंदिर. पुरोहित कुटूंबातील राधाबाई या मंदिराची देखभाल करीत असे. कौलारू असलेलं मंदिर पुढे काही काळाने कोसळलं. तेव्हा किरवली गावातील मुंबईत राहणारे नाटयकर्मी रमेष चौधरी यांचे बंधू जे.पी. चौधरी यांनी मंदिराला सध्या असलेला घुमट व दगडी बांधकाम केले. तद्नंतरच्या काळात विराराचे भाई ठाकूर यांनी रू. २५,000/- ची देणगी देऊन देवस्थान मंडळाच्या माध्यमातून सध्याचे असलेले मंदिराचे बांधकाम केले. साधारणता डिसेंबर महिन्यात मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तजयंती उत्सव दत्तमंदिरात साजरा होतो.

।। श्री बामण देव मंदिर ।।

तलावाच्या काठावर असलेलं आणखीन एक छोटसं मंदिर म्हणजे पाटील व चौधरी कुटुंबियांनी बांधलेले श्री बामणदेवाचे मंदिर. ही जागा गावातील श्री. रमेष वामन पाटील व कुटुंबियांची. बामण देवाची पुजापाठ पाटील व चौधरी कुटुंबीय करतात. गावात कुठेही शुभकार्य असले की बामणदेवाला नारळ दिला जातो.

।। श्री बामण देव मंदिर ।। (सॉल्ट कॉलिनी)

स्वातंत्र्य पूर्व काळापासून आजुबाजूला मिठागरे बनली गेली. साॅल्ट डिपार्टमेंट मध्ये मोठया संख्येने कोकणातून आलेले शिपाई व कर्मचार्यांसाठी चाळीचे बांधकाम केले. त्यात सुर्वे, मयेकर, मोरे, मांजरेकर, सावंत इत्यादी कुटुंबे रहायला आली. व अनेक पिढयांनंतर गावातील घटक बनली. त्या काळात पाशाण सदृश मुर्ती शिपायांच्या निदर्षनास आली. सुरूवातीस दर्शनासाठी माणूस वाकून प्रवेश करू शकेल असे शेड असलेले मंदिर होते. सन 1970 च्या दशकांत कस्टम विभागातील तरूणांनी परिश्रम करून मंदिराचा जिर्णोध्दार करण्यास सुरूवात केली. हळुहळु मंदिराची वास्तू निर्माण होत आहे. आता इथे असलेल्या चाळींची संख्या कमी होत आहे. पूर्वी असलेली कुटुंबे विखुरली गेली आहेत. परंतू मंदिराच्या माध्यमातून सर्व एकत्र येतात या विभागात 1967 पासून कार्यरत असलेल्या उज्ज्वल क्रीडा मंडळ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खेळ, शैक्षणिक व सामाजिक कार्याबरोबरच धार्मिक भावनेतून श्री बामण देव उत्सव समिती स्थापन केली आहे. वैशाख पौर्णिमेला (बुध्दपौर्णिमा) श्री बामण देवाचा उत्सव साजरा केला जातो त्यावेळेस परिसरातील मुलामुलींच्या कलागुणांना वाव दिला जातो. तसेच गोपाळ काला, नवरात्रौत्सव या माध्यमातून विद्यार्थी गुणगौरव केला जातो. उज्वल क्रीडा मंडळाच्या सहकार्याने मंदिरामध्ये मोफत वृत्तपत्र वाचनालय चालविले जाते. तसेच त्रिपुरारी पौर्णिमेला सौ. लिलू वहिनी सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील महिला दिव्यांची रोशणाई करतात.

।। श्री साई गणेश मंदिर ।।

गावातील विद्यमान माजी नगरसेवक व दानशुर बिल्डर श्री. प्रविण शांताराम वर्तक यांनी स्थापित केेलेले श्री साई गणेश मंदिर, या मंदिरात गुरूतुल्य श्री गगनगिरी महाराज, श्री साई बाबा आणि विघ्नहर्तारी श्री गणपतीची मुर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. त्याचा वर्धापनदिन सोहळा हा गावातील आगळा वेगळा सोहळा असतो. त्यानिमित्ताने येथील मंडळी भंडाराचे सुध्दा आयोजन करतात.