कार्यक्रम / उत्सव
श्री साकाई देवीचा हरीक
देवीच्या मूळस्थानी ऊमेळे गावच्या आगमनाचे देवीची आळवणी करताना देवीच्या महती स्तवन करणारी गीते ऐका विशिष्ट पद्धतीने गायली जातात त्यास देवीचा हरीक असे म्हटले जाते. ह्या हरीकाच्या वेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित असतात व त्या नंतर गावात प्रत्येकाच्या लग्नकार्य आधी देवीला हरीक भरला जातो. ह्यावेळी नवरदेव किंवा नवरी मुलीला सोवळे वस्त्र परिधान करतात
श्री साकाई देवी यात्रौत्सव
श्री साकाई देवी, आमच्या उमेळे गावाची ग्रामदेवता आपणा सर्वांची श्रद्धास्थान. गावात देवीच्या प्रतिष्ठापनेनंतर दरवर्षी चैत्र कृष्ण चतुर्दर्शीला देवीचा यात्रोत्सव साजरा होतो. संपूर्ण महाराष्ट्रात सर्व देवींची “चैत्रवळ ” ह्या शब्दाने सर्वश्रुत असलेला हा उत्सव उमेळे गावात पारंपरिक पद्धतीने आजही होत आहे, आर्थिक परिस्थिती बेताची व पाण्याचे दुर्मिक्ष्य असतानाही नातेवाईक व पाहुण्यांचा राबता गावातील प्रत्येक घरात असायचा. अनेक प्रकारची दुकाने , पाळणे, खाद्यपदार्थ ह्याचबरोबर रात्रौ नाट्यकृतीचा आस्वाद देवीच्या आशिर्वादाबरोबर भक्तगणजतन करीत असत. आजही पंचक्रोशी व मुंबई (पालघर) स्थित हजारो भाविक यात्रोत्सवाला उपस्थित असतात व देवस्थान मंडळातर्फे सर्वांची योग्यप्रकारे व्यवस्था ठेवली जाते.
नवरात्रौउत्सव
गणरायाला वाजत गाजत निरोप दिल्यानंतर गावात नवरात्रौउत्सवाचे पडद्यम वाजू लागतात.विविध स्पर्धांच्या आयोजना सबंधी बैठक घेवून स्पर्धा प्रकार ठरवले जातात ५१ गटात ह्या स्पर्धा होतात. देवळाभोवती मंडप घालून शोभनिय रोषणाई केली जाते.रोज देवीला अभिषेक केला जातो.अष्टमीच्या होमाच्या दिवशी भंडारचे आयोजन केले जाते.गरबानृत्यात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतात. विजया दशमीचे दिवशी सायंकाळी दसरा संमेलनावेळी मान्यवर पाहुण्यांचे मार्गदर्शन व बक्षिस समारंभानंतर आपट्याची पाने लुटून देवीला सोन रूप कार्यक्रमा नंतर देवीच्या आरती ने कार्यक्रमाची सांगता होते. आमच्या ह्या जागृत देवीला भेटण्यासाठी मुंबई पासून पालघर पर्यंतचे भाविक आमच्या गावात ९ दिवस येत असतात.
गणपती उत्सव
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची तत्कालीन गरज काहीही असो. पण आज १०० वर्षांनंतरही गणेशमूर्तीची स्थापना प्रत्येकाच्या घरोघरी असून देखील आमच्या गणेशोत्सवाला सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप आलेले आहे. विविध विषयांवरील, चलचित्रे गणपतीच्या आरत्या, रात्रीचा जागर याने गावातील वातावरण मंगलमय झालेले असते. विसर्जनाची मिरवणूक अत्यंत भक्तिभावाने पार पडते.
हनुमान जयंती उत्सव
उमेळे ग्रामस्थ देवस्थान मंडळाच्या अखत्यारित येत असलेले हनुमान मंदिर देखील ग्रमास्थांनी फार पूर्वी बांधलेले आहे. हनुमान जन्माच्या सुश्राव्य किर्तनाने उत्सवाची सुरवात होते. मूर्तीला अभिषेकानंतर दर्शनारंभ होतो. संपूर्ण दिवस भाविक दर्शनाला येतात. सायं भजन व रात्रौ नाट्यकृती किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होते. मंदिरात औदुबराच्या काष्ठापासून बनवलेली राम लक्ष्मण सीतेसह असलेली हनुमानाची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते.
दत्तजयंती उत्सव
साधारणता डिसेंबर महिन्यात मार्गशीर्ष पौर्णिमेला हा उत्सव आमच्या दत्तमंदिरात हि साजरा होतो. मूर्तीला अभिषेक पूजन आरती व दिवसभर धार्मिक कार्यकर्मानंतर सायंकाळी दत्ताच्या पाळण्यानंतर रात्री भजनानंतर उत्सवाची सांगता होते.गावातली कलाकारांना संधी मिळावी ह्या द्रुष्टीने ह्या दिवशी एकांकिका सादर केल्या जात असत.
गावहाळी
देवीचे आगमन उमेळे गावच्या वेशीवर आल्यानंतर देवीच्या रक्षकांना नैवेद्य देण्याचा प्रघात पूर्वापार सुरू होता व आहे.रात्रौ देवीचा हरीक भरल्यानंतर नैवेद्य हातात घेऊन गावातील तरूण मंडळी ‘वागरू – वागरू’ म्हणत गावच्या सभोवताली वेशीवर रक्षकांना नैवेद्य दाखवला जातो.गावातील लग्नसमारंभ गावहाळी झाल्याशिवाय पार पडत नाही. ती परंपरा गावातील तरूणांनी आजही टिकवून ठेवली आहे. पण गावहाळी (गावाळी) गावकऱ्यांनी देवाला दिलेली हाक.
गुढीपाडवा
मराठी वर्षाची सुरुवात चैत्रशुद्ध प्रतिपदेने होते. सरत्या मराठी वर्षाला निरोप देऊन गुढीपाडवयाच्या दिवशी गावातील लहान थोर पारंपरिक वेशात हनुमान मंदिराच्या प्रांगणात जमतात. नववर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्यानंतर ढोलताशे लेझिमच्या तालात गावातून नववर्षाच्या स्वागताची मिरवणूक काढली जाते.गावातील कला-क्रीडा प्रेमी मंडळी हा कार्यक्रम दरवर्षी राबवित असतात.
श्रावणातील शनिवारची वाडी
पवनपुत्र हनुमानाचे सुंदर मंदिर उमेळे ग्रामस्थ देवस्थान मंडळातर्फे गावात बांधण्यात आले. श्रावणी शनिवारी गावातील भक्तजणांकडून हनुमान मूर्तीला वाडी अर्पण करण्यात येते. केवडा व फुलांची ताटी [आरास] बनवून आपापल्या घरातून वाजत गाजत सर्वजण एकत्र हनुमान मंदिरा भोवती ५ प्रदक्षिणा घालतात.दिंडी स्वरूप दिसणारे हे द्रुश्य अत्यंत विलोभनीय असते त्यानंतर अत्यंत भक्तिभावाने इच्छित मनोकामना पूर्तीसाठी वाडी अर्पण करून आरती होते.पूर्वी वाडीचा जागरहि होत असे.व पहाटे वाडी विसर्जन करून फळांचा प्रसाद केला जात असे.
बामणदेव उत्सव
गावतील स्लॉट कॉलनी परिसरात बामण देवाचे मंदिर आहे. पूर्वापार गावात स्थायिक झालेली मंडळी या मंदिराचा कारभार पाहतात व बौध्य पौर्णिमेला बामण देवाच्या उत्सव साजरा करतात. विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात.
गगनगिरी महाराज उत्सव
नायगाव स्टेशन ते उमेळे गावात येताना साकाई नगर मधली गणेश साई गगनगिरी मंदिर मंडळाने प्रवीण वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली बांधलेले गणपती साई बाबा व परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या मूर्ती स्थापित असलेल्या मंदिरात नकळत सर्वांचे हात जोडले जातात. या मूर्तीच्या प्राणप्रतिष्टेच्या निमित्ताने परमपूज्य गगनगिरी महाराजांचे पद स्पर्शाने आमचे उमेळे गाव धन्य झाले. मंडळाकडून अनेक लोकपोयोगी कार्यक्रम केले जातात. वर्धापन दिन सोहळा १ मे रोजी पार पाडला जातो. त्या निमित्ताने भंडाराचे सुद्धा आयोजन करतात.
पुरुष / महिला भजनी मंडळ
परम पूज्य दत्तू चव्हाळे बुवांचे शिष्य जयवंत बुवा म्हणजे जयवंत हरिचंद्र वर्तक यांनी हनुमान प्रासादिक भजन मंडळाची स्थापना करून गावोगावी भजना द्वारे तरुणांमध्ये भक्ती भावाची गोडी लागली. त्यांचा वारसा पुढे गावातील पुरुष आणि महिला मंडळानी आजही जोपासला आहे.