श्री साकाई देवीचा इतिहास

उमेळे येथील साकाई देवी वसई तालुक्यातील एक जागृत आदिशक्ती देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. श्री साकाई देवी अर्थात सकलजनाची आई असा नावलौकिक असणारे हे आदिशक्ती स्थान पाहण्यास दरवर्षी हजारो भाविक नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने हजेरी लावतात. वसई तालुक्यातील आदिशक्ती स्थानांपैकी प्राचीन परंपरा जपणारी श्री साकाई देवी भक्तांच्या संरक्षणासाठी नेहमीच धावून येते, असा साऱ्यांचाच दृढ विश्वास आहे.

19 व्या शतकाच्या प्रारंभी उमेळे गावाच्या हद्दीत असणाऱ्या सोपारा (सोपार) खाडीत मच्छीमारी निमित्ताने गेलेल्या शेजारच्या गावातील मच्छीमारांना या देवीचे प्रथम दर्शन झाले. अनेक ग्रामस्थांनी प्रयत्न करूनही मूर्ती उचलण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. याच दरम्यान त्याच दिवशी रात्री उमेळे गावच्या जेष्ठ नागरीकांस (पाटील कुटुंबातील एका मुक्या भक्तास) देवीने दृष्टांत दिला व उमेळे गावात स्थान व्हावे अशी इच्छा प्रकट केली. याप्रमाणे गावातील स्थानिक पाच भक्तांनी देवीची मूर्ती गावात आणली.

श्री साकाई देवीच्या सध्या उभे असणाऱ्या मोठया स्वरूपातील मंदिर अगोदर देवीचा प्रवास तीन पावलांत होता. या तीन पावलांत साकाई देवीने उमेळे व्यापले. प्रथम स्थान देवीचा वाडा (मुळस्थान), दुसरे स्थान श्री साकाई देवी स्थान (उमेळे – वर्तक कुटुंबीय) तिसरे स्थान सध्या उभे असलेले भव्य मंदिर स्वरूप. सन 1930 मध्ये घुमटाचे रूपांतर मंदिरात करण्यात आहे. 

श्री साकाई देवी उमेळे ग्रामवासियांची ग्रामदेवता व मुंबईतील अनेकांची कुलस्वामिनी आहे. वजेश्वरी, जगमाता, जीवदानी, आनंदी भवानी, चुळणाई, शितलादेवी व साकाई अशा सात देवी बहिणी म्हणून संबोधल्या जातात. वसई परिसरात या सातही देवींची जागृत शक्ती स्थाने आहेत. सदर शक्तीस्थानी होणाऱ्या नवरात्री उत्सवात गावातील सर्व धर्माचे लोक सहभागी होतात.

व्याधी, कर्ज, दारिद्रय, दुःख, पाप, अपमृत्यू, भीती, मानसिक तणाव इ. याचा साकाई देवीच्या आशिर्वादाने विनाश होतो आणि व्यवहारात उत्कर्ष, शिक्षणात यश, जीवनात आरोग्य, दीर्घायुष्य, प्रपंचात सुख यांची प्राप्ती होते. श्री साकाई देवीची यात्रा दरवर्षी चैत्र वद्य चतुर्दषी या काळात आयोजित करण्यात येते. श्री साकाई देवी उमेळे ग्रामवासियांची ग्रामदेवता व मुंबई परिसरातील अनेकांची कुलस्वामिनी. मुंबई परिसरातील उपलब्ध माहितीनुसार गिरीधर, पोतदार, आगासकर, छापवाले इ. आडनावे असणाऱ्यांची श्री साकाई देवी कुलस्वामिनी आहे. मुंबई परिसरातील बऱ्याच सोनारांची कुलदेवता श्री साकाई देवी आहे.